विदुराची भक्ती
- Akhand Jyoti Magazine
- Aug 9, 2021
- 1 min read
विदुरांनी खूप सांगून पाहिले पण धृतराष्ट्र व दुर्योधन आपल्या अनीतीचा मार्ग सोडण्यासाठी काही करतील असा काही भास त्यांना होऊ शकला नाही. त्यांच्या जवळ राहण्यामुळे व त्यांच्या घरचे जेवण जेवल्यामुळे आपल्या सात्त्विक वृत्तींवर देखील प्रभाव पडण्याची शक्यता आहे, असा विचार करून ते हस्तिनापुरच्या बाहेर वनात एक लहानशी कुटी बांधून तिथे राहायला लागले. त्यांची पत्नी सुलभाही जंगलातली भाजी तोडून आणायची व ती उकडून खाऊन त्यावर दोघे आपला निर्वाह चालवू लागले. आपला बाकीचा वेळ दोघेही सत्कर्मात व प्रभूच्या स्मरणात घालवू लागले.
श्रीकृष्ण शांतिदूत म्हणून हस्तिनापुरला आले. पण संधीवार्ता असफल झाली. द्रोणाचार्य, धृतराष्ट्र, दुर्योधन यांचा जेवणाचा आग्रह असतांना त्यांनी त्यांना नकार दिला व ते विदुराच्या घरी गेले. तिथे जाऊन त्यांनी आपली भोजन करण्याची इच्छा सांगितली.
विदूर संकोचात पडले. त्यांना वनातली उकडलेली भाजी कशी वाढायची? ते विचारू लागले, “प्रभू, तुम्ही उपाशी होता, जेवणाची वेळ पण झाली होती, मोठ्यांनी आग्रह देखील केला असेलच. मग तुम्ही तिथले जेवण टाकून इथे या कुटीत कसे आलात?”
प्रभू म्हणाले, “विदूरकाका जे भोजन करणे तुम्हाला योग्य वाटले नाही, तुमच्या घशाखाली जे उतरू शकले नाही, ते मला कसे रुचणार होते? तुम्हाला जे अन्न रुचेल तेच मला देखील आवडेल. यात अनुचित काय आहे?"
विदुर भाव विव्हळ झाले. प्रभूचे स्मरण झाले की अन्नाची चव बाजूलाच राहते व संस्कार प्रिय वाटू लागतात. मग प्रत्यक्ष प्रभूची भूक या पदार्थाने कशी बरे भागू शकेल? त्यांना तर भावनेची भूक असते. विदुराजवळ भावभक्तीची कमतरता नव्हतीच. भाजीच्या वाटेने हे भावनांचे दिव्य देवाणघेवाण सुरू झाले आणि असा आगळा आनंद दाटला की त्यात दोघेही धन्य होऊन गेले.
अखण्ड ज्योती (मराठी) नोव्हेंबर 2008
Comments