top of page
Post: Blog2_Post
Search

गायत्रीची नवधा सिध्दी- धिय: म्हणजेच सद्बुद्धीची प्रार्थना*


'धी ' म्हणजे बुद्धी. बुद्धीच्या अनेक पातळ्या आहेत. त्यांची नावे देखील अनेक आहेत. अक्कल, हुशारी, चातुर्य शहाणपण, तीक्ष्ण बुद्धी, प्रसंगावधान, दूरदृष्टी हे सर्व शब्द बुद्धीच्या विशेष गुणांचे अर्थ सांगण्यासाठी प्रयुक्त होतात. साधारणपणे मेंदूच्या शक्तीला बुद्धी असे म्हणण्यात येत असते. ज्याचा मेंदू अधिक बळशाली असेल, अधिक सूक्ष्म असेल, अधिक ताजातवाना व स्फूर्तिवान असेल त्याच 'माणसाला बुद्धिमंत असे म्हणण्यात येते. ज्याच्या जवळ हे बुद्धीचे गुण नाहीत त्याला मूर्ख म्हणण्यात येत असते.

पण ही व्याख्या मात्र फार स्थूल आहे. अर्धवट आहे. जगात कितीतरी लोक आपले चातुर्य दाखवितात, अक्कल हुशारी दाखवितात, धूर्तपणा दाखवितात पण त्यांना लोक धूर्त, ढोंगीबगळा व चार घाटांचे पाणी पिणारा असे म्हणून त्यांची संभावना करतात. त्यांचे बुद्धिकौशल्य पाहून चतुर कावळा देखील दंग होऊन जातो. ज्यांच्या जवळ फार तल्लख असा मेंदू आहे ते बहुतांशी लोक चोरी, लबाडी, धूर्तपणा, बदमाशी खोटेपणा करण्यात आपल्या बुद्धीची किमया दाखवितात लोक त्यांना दुष्ट, लबाड मानतात, खोटारडा समजतात. पण त्यांच्या मेंदूची मात्र दाद द्यावी लागते. तीक्ष्ण बुद्धी असल्याशिवाय जगभरची भानगड करणे, लोकांना फसवून त्यांना चकमा देणे व त्यांना आपल्या जाळ्यात पकडणे यासारख्या करामती कशा होऊ शकणार ?

पण अशी ही बुद्धी कामाची नाही. अशी बुद्धी असण्यापेक्षा मुळीच बुद्धी नसणे एकापरी बरे म्हणायला पाहिजे, गायत्रीने अशा बुद्धीची देणगी दिली नाही. तिच्याकडे अशा बुद्धीची मागणी करण्यात येत नाही. अशीच हुशारी मिळवायची असेल तर त्यासाठी मोठमोठ्या कॉलेजात जावे, व्यापाऱ्यांच्या बाजार पेठेत जावे, वस्ताद लोकांच्या 'टोळी मध्ये सामील व्हावे, करामती करू शकणाऱ्या शेठांच्या टोळक्यात जावे, देशाटन करावे, त्या त्या विषयाच्या विशेषज्ञा जवळ जावे. म्हणजे ही अशी उफराटी बुद्धी सहजपणे मिळू शकेल. त्यासाठी आत्म्याला परमात्म्या समोर जाऊन त्याचा धावा करण्याची काही आवश्यकता नाही.


आत्म्याला सर्वात जास्त ज्या गोष्टीची आवश्यकता भासते ती आहे सद्बुद्धी. याच सद्बुद्धीला 'धियः' असे म्हणतात. या सद्बुद्धीच्या ऐवजी ज्याला कुबुद्धी लाभलेली असेल तर त्याला पदोपदी पतनाच्या मार्गाला जावे लागते, त्याचा जीवनात नरकासारखी परिस्थिती उत्पन्न होते. अनाठायी परिस्थितीत त्याला खिचपत पडून राहावे लागते व त्याचा अंतरात्मा टाहो फोडीत राहतो. त्याला अतोनात कष्ट होतात. दुःख सहन करावे लागते. त्याच्या जवळ धनाची कमतरता नसते. मौजमजा करण्याची त्याला कधी वाण पडत नाही. पण त्याच्या याच कार्यामुळे त्याच्या अंतरात्म्याला कष्ट सहन करावे लागतात. त्याच्यावर एक प्रकारचे मोठे दडपण येऊन पडते. या भाराखाली त्याचा अंतरात्मा कासावीस होतो. फार आक्रोश करू लागतो. तडफडू लागतो. कण्हू लागतो. या वाईट परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी परमात्म्याकडे तो साद घालीत राहतो. तो म्हणतो, "हे देवा, सद्बुद्धी नसल्यामुळे, 'धियः' ची कमतरता असल्यामुळे मला पदोपदी ठेचकाळत राहावे लागते. क्षणोक्षणी माझ्यावर कुठाराघात होत असतात. कृपाकरून आपण मला' धिय: 'ची प्रेरणा द्या, 'धी' तत्वाने हे जीवन परिपूर्ण होऊ द्या. या कुबुद्धीपासून माझी सुटका होऊ द्या. दिव्य जीवनाचा मला आनंद घेऊ द्या. आत्म्याला संतोष मिळू द्या. माझी ही केविलवाणी स्थिती दूर जाऊ द्या."

गायत्रीच्या पूर्वार्धामध्ये सवित्याचे, त्या वरेण्य भर्ग देवाचे ध्यान सांगण्यात आले आहे. या ध्यानाचा उद्देश काय ? का करायचे हे ध्यान ? याचे स्पष्टीकरण उत्तरार्धात करण्यात आले आहे. ते प्रयोजन आहे 'धियः ' ची म्हणजे सद्बुद्धीची प्राप्ती. परमात्म्याचे सामीप्य प्राप्त करण्यासाठी गायत्री हा सर्वांत मोठा महान व सर्वोत्कृष्ट असा मंत्र आहे. त्याचे लक्ष्य, त्याचा उद्देश व त्याचे प्रयोजन हे सर्वात मोठे आहे, श्रेष्ठ आहे. सद्बुद्धीचा लाभ होणे हे सर्वश्रेष्ठ वरदान होय. हा सर्वात मोठा लाभ होय. त्याच्या तुलनेत कुठलीच सिद्धी, कुठलीही संपत्ती टिकून राहू शकत नाही. हा सर्वोत्तम लाभ मिळविण्यासाठी अंतरात्म्याची जी साद आहे, जी हाक आहे जी टाहो फोडण्यात आला आहे, जी आकांक्षा आहे, जी तहान आहे, त्याचेच प्रगट स्वरूप आहे गायत्री. गायत्री मध्ये 'बी' चा उपयोग सद्बुद्धीच्या प्राप्तीसाठीच करण्यात आला आहे. त्याचे काही प्रमाण आहेत- धी शब्दो बुद्धिवचनः कर्मवचनो वा वाग्वचनश्च सायन उव "धी' हा शब्द बुद्धी कर्म व वाक्य यांचे प्रकटीकरण

करणारा आहे.

बुद्धयो वै धियः मैत्रा 67. बुद्धी म्हणजेच धी होय.

धर्मादि विषया बुद्धिः याज सामन धर्म विषयात लागणाची जी बुद्धी आहे तिला धी म्हणतात.

धियो धरणवत्यो बुधयः । विष्णुभाष्य धारण करण्याच्या बुद्धीचे नाव धियः आहे. कर्माणि धियः- अथर्वण कर्माला बुद्धी म्हणतात.

धियः हे पद सांगते की बुद्धिमंताने वेदशास्त्राचे आपल्या बुद्धीने मंथन करावे व त्यातून उत्तम तत्वाचे लोणी काढावे. कारण शुद्ध बुद्धौनेच सत्य काय ते जाणता येऊ शकते.

अखंड ज्योती ऑगस्ट 2009

 
 
 

Recent Posts

See All
आमचा युग - निर्माण सत् संकल्प

मी आस्तिकता आणि कर्तव्यनिष्ठता हे मानवी जीवनाचे धार्मिक कर्तव्य मानतो. शरीराला देवाचे मंदिर मानून मी आत्मसंयम आणि नियमिततेने माझ्या...

 
 
 

Comments


©2020 by DIYA (Youth wing of AWGP). 

bottom of page