top of page
Post: Blog2_Post
Search

गायत्री साधना

आयुष्य उजळविण्यासाठी आध्यात्मिक प्रयोग


गायत्री सद्बुद्धी देणारी आहे. गायत्री महामंत्रामध्ये देवाजवळ सद्बुद्धी देण्यासाठी प्रार्थना करण्यात आली आहे. याच्या २४ अक्षरांमध्ये २४ प्रकारचे शिक्षण अंतर्भूत झाले आहे. श्रेष्ठ संदेश समाविष्ट झाले आहेत. त्यांना सद्बुद्धीचे प्रत्यक्ष प्रतीक म्हणून मानले जाते. हे शिक्षण सर्वांगीण आहे. त्यामुळे मनुष्याचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो, शुद्ध होतो. भ्रमातून उत्पन्न होत असलेल्या अविद्येचा नाश होतो. या अविद्येमुळेच मनुष्याच्या जीवनात पदोपदी कष्ट त्रास, संकटे उत्पन्न होतात. त्यासाठी हे शिक्षण हृदयंगम करणे आवश्यक आहे. गायत्री महामंत्राची रचना वैज्ञानिक आधारावरच झाली आहे. त्याची साधना केल्याने आपल्या अंतरात सुप्त पडलेल्या अनेक गुप्त शक्तिकेंद्रांना जाग येते व अंतरातून सात्त्विकतेचा निर्झर वाहू लागतो. त्याची चुंबकीय शक्ती विश्वव्यापक आहे. ब्रह्मांडातील सात्त्विक शक्तींना आपल्याकडे खेचून घेण्याची व त्यांचा आपल्या अंत:करणात साठा करून ठेवण्याची अद्भुत शक्ती त्याच्या ठायी आहे. म्हणूनच गायत्रीला दुर्बुद्धीचे शमन करू शकणारी अचूक रामबाण मंत्रौषधी म्हणून मानण्यात येते. गायत्री मंत्र अत्यंत प्रभावकारक आहे. दुर्बुद्धीचे शमन झाल्यास मनुष्याच्या अनेक दुःखांचा आपोआप निश्चितपणे नाश होऊन जातो. गायत्री ज्ञानाची प्रचंड ज्योती आहे. या प्रकाशामुळे अज्ञानाचा अंधकार दूर होतो. अंतरात्म्याला आपली स्वाभाविक स्थिती प्राप्त होते. तो या पुण्यपावन धरती मातेच्या अंगावर, तिच्या परमशक्ती देणाऱ्या भूमीवर उन्मुक्तपणे खेळू लागतो.


रंगीत काचेचा चष्मा लावला तर ज्या रंगाची ती काच असेल त्याच रंगाचे सारे विश्व आपणास दिसू लागते. कुबुद्धीचा चष्मा लावल्यास साध्या अशा गोष्टी व घटना देखील आपणास वाईट, दुःखद व संकटासारख्या वाटू लागतात. ज्याला चक्कर येण्याचा रोग जडतो त्याचे डोके भिरभिरू लागते, तेव्हा त्याला वाटते की सारे जग गरगर फिरू लागले आहे. पृथ्वी, त्यावरील घरे, झाडे, पर्वत सारे काही फिरत आहे, असे भासू लागते. जो घाबरट असेल त्याला झुडपांच्या आतही भूत दिसू लागतो. ज्याच्या अंगी दोष आहेत त्याला बाहेरच्या किंवा वरवरच्या सुधारणेने काही फायदा होण्यासारखा नसतो. त्याच्या आतला मूळ रोग जेव्हा दूर होईल तेव्हाच त्याला बाहेरच्या ज्या भ्रमाच्या अनुभूती आहेत त्यांचे निवारण होऊ शकेल. पिवळ्या काचेतून पाहिल्यावर समोरच्या सर्व वस्तू त्याला पिवळ्याच दिसू लागतील. तापाने तोंडाची चव गेली असेल तर त्याला चांगले गोड व स्वादिष्ट पदार्थ देखील बेचव किंवा कडू लागतील. ज्याचा दृष्टिकोन कुबुद्धीने विकृत झाला आहे. त्याचा विचार देखील वाईटाकडेच दृष्टी लावून ठेवीत असतो. त्याला स्वर्गात जरी नेऊन बसविले, कुबेरासारखे अखंड धन जरी त्याला दिले, इंद्रासारखी विस्तृत सत्ता जरी त्याच्या हाती सोपविली तरी त्याची दुःखातून सुटका होणे शक्य नाही.


गायत्री महामंत्राचे मुख्य कार्य या कुबुद्धीचे निवारण करणे हेच आहे, जो मनुष्य या दुर्बुद्धीपासून दूर होण्यासाठी, त्यापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी प्रयत्न करण्याचा निश्चय करतो, तोच खरा गायत्रीचा उपासक आहे. या उपासनेचे फळ ताबडतोब मिळते. ज्याने आपल्या अंतःकरणात सद्बुद्धीला स्थान दिले असेल त्याला याच देही त्याच्या आवाक्याच्या मानाने योग्य ते फळ मिळते. त्याला आनंदमय स्थिती लाभते. त्याचे चित्त, अंतःकरण आनंदाने भरून जाते.


याचा अर्थ गायत्री उपासना ही केवळ जीवनाची सुधारणा करण्याचा एक मानसशास्त्रीय प्रयोग आहे, असा समज मात्र कोणी करून घेऊ नये. गायत्री मंत्राचे तात्त्विक सामर्थ्य व भावनात्मक आवाका एवढा मोठा आहे की त्यामुळे आपल्या संपूर्ण लौकिक संकटांचा नाश करून त्याचबरोबर आपल्या शरीरातल्या शक्तिकेंद्रांचा विकास करण्याचे कार्य वेगाने घडविणे शक्य होत असते. या चक्रांमध्ये, उपत्यिकांमध्ये प्रचंड शक्ती भरून पडली आहे. विलक्षण क्षमतेचे ते भांडार आहे. साधकाला अणिमा, गरिमा, लघिमा, महिमा, ऋद्धी, सिद्धी यांनी विभूषित करून देण्याचे सामर्थ त्याच्या ठिकाणी आहे. माणसाची आंतरिक शक्ती जागृत झाल्याने त्याचा प्रभाव त्याच्या व्यक्तिमत्त्वावर पडतो व त्याचा विकास होतो, त्याचे अंतर्बाह्य रूपांतरण होत असते.


व्यायाम केल्याने शरीर धष्टपुष्ट होते, अभ्यास केल्याने विद्या येते, मेहनत केल्याने धन येते, सत्कर्मे केल्याने यश मिळते व सद्गुण अंगी असतील तर मित्रांचा व्याप वाढतो. त्याचप्रमाणे उपासना केल्याने आपल्या शरीरात सुप्त पडलेली प्रचंड शक्ती जागृत होते. त्या जागृतीच्या प्रभावानेच मानवी जीवनात एक श्रेष्ठत्व, एक वैशिष्ट्य प्रत्यक्ष प्रगट होऊ लागते. त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा कायापालट होत असतो, त्याच्या ठिकाणी तेजस्वीपणाची वाढ होते. तेजस्वी व मनस्वी व्यक्ती प्रत्येक क्षेत्रात आपली छाप पाडते व सहजपणे यश प्राप्त करू शकते.


मानवी मेंदूमध्ये जी अनेक शक्तिकेंद्रे आहेत, त्यांचा मानवाने पूर्णपणे उपयोग तर केला नाहीच पण त्याला , त्याचा पूर्ण परिचय देखील अजूनपर्यंत होऊ शकला नाही. माणसाच्या मनात , अंतर्मनात जी प्रचंड शक्ती सुप्त पडून राहिलेली आहे तिचा केवळ दोन टक्के एवढाच भाग आजपर्यंत मानसशास्त्रज्ञांना फार गहन व कठीण संशोधन केल्यानंतर गवसू शकला आहे. याचा अर्थच असा की या मनाच्या सामर्थ्याचे ९८ टक्के एवढे ज्ञान अजून पर्यंत माणसाला झालेले नाही. शरीरशास्त्रज्ञांना माणसाच्या मेंदूचे जेवढे ज्ञान झाले आहे, ते फक्त त्याच्या एकूण शक्तीच्या मानाने ८ टक्के एवढेच आहे. बाकी ९२ टक्के मेंदूची शक्ती अजून माणसाला अपरिचित आहे. मानवाचा मेंदू म्हणजे एक जादूचा पेटारा आहे, असे म्हटल्यास वावगे होणार नाही. त्याच्या ठिकाणी विचार करण्याची, चिंतन करण्याची कुठलीही गोष्ट, आकलन करून घेण्याची क्षमता तर आहेच पण त्याचबरोबर एक विलक्षण अशी चुंबकशक्ती आहे. अनंत आकाशात भ्रमण करीत असलेल्या अद्भुत शक्ती सिद्धी, विभूती, ह्यांना आपल्याकडे ओढून घेण्याचे सामर्थ्य त्याच्याजवळ आहे. त्यामुळे त्याला सफल होण्यासाठी वेगळी सहायता लाभत असते. सूक्ष्म विश्वात आपल्याला अनुकूल असे वातावरण निर्माण करण्याची क्षमता त्याच्याजवळ आहे. ज्या ज्या व्यक्तींशी आपले संबंध जुळलेले आहेत, ज्यांच्याविषयी आपण काही चिंतितो, ज्यांच्याशी आपल्या कामना, इच्छा, आकांक्षा यांचा संबंध असतो, त्यांच्यावर या क्षमतेमुळे मोठा प्रभाव टाकणे शक्य होऊ लागते व त्यांना आपणाला अनुकूल करवून घेता येऊ शकते. त्यांनी आपणाला अनुकूल असे वागावे, असे त्यांना भाग पाडता येऊ शकते. गायत्री उपासने द्वारे मनुष्याच्या अंतरंगात, अशीच विलक्षण चुंबक शक्ती उत्पन्न होत असते. त्याचे मनोबल वाढते व त्यामुळे मनः क्षेत्रात एक प्रकारचा विद्युत प्रवाह वाहू लागतो. अंतरंगात सुप्त पडून असलेल्या शक्ती जागृत होऊ लागतात व आपल्याला आवश्यक अशा अनुकूल घटना घडून येऊ लागतात. मेंदूचा चुंबक सक्रिय होतो व आपल्या समोर सफलतेचे ढीग लागून राहतात. त्यांनाच आपण नेहमीच्या भाषेत सिद्धी, विभूती, वरदान, दैवी साहाय्य इत्यादींच्या नावाने ओळखतो.


उपासनेच्या अवधीत आपण केलेल्या तपश्चर्येने करुणा येऊन गायत्री माता आपल्या झोळीतून अमुक एक सिद्धी आपणाला काढून देते किंवा अमुक प्रकारची सफलता देते, अमुक यश देते, असा एक सामान्य भाविकांचा दृष्टिकोन असतो. पण याचे वैज्ञानिक दृष्ट्या विश्लेषण केले तर कळून येते की आपण अवलंबिलेले कठोर नियम, अनेक प्रतिबंधांचे पालन, इत्यादी केल्याने आपल्या अंगातील क्षमता वाढते, त्यामुळे आपले मनोबळ उंचावते. संकटांचा सामना करण्याचे आपले सामर्थ वाढते. आपल्या आत असलेल्या अनेक सुप्त शक्तिकेन्द्रांचे चुंबकत्व जागृत होते व त्या जागरणामुळे अनेक प्रकारचे यश आपणाला अनायासेच प्राप्त होते. मनुष्य हा स्वतः एक देवच आहे. या विश्वात ज्या अनेक शक्ती आहेत, त्याचे बीज मनुष्याच्या अंतरंगात कायम असते. त्या सर्व शक्ती सुप्तावस्थेत त्याच्या आत असतात. विश्वात इतरत्र राहणारे देवशक्ती आपापले कार्य करण्यात आपापल्या जबाबदाऱ्या पार पाडण्याच्या कार्यात मग्न असतात. ते आपल्या व्यक्तिगत कामासाठी एवढी आस्था का बरे दाखवितील ? जगात अगणित उपासक आहेत, त्या सर्वांचे अगणित प्रकारचे कार्य करण्याची, त्यांच्या समस्या सोडविण्याची त्यांना कुठे फुरसत मिळणार? आणि त्यांनी मग आपले स्वतःचे काम केव्हा करायचे? आपल्या समस्या दूर करण्याचे कार्य आपल्या अंतरंगात बसलेल्या देवशक्ती करू शकतात. त्या देवशक्तीला आपण करीत असलेल्या उपासनेने, अनुष्ठानाने व तपश्चर्येने जागृत करण्याचे कार्य आपण करीत असतो व त्यामुळे आपले प्रयोजन पूर्ण होण्यास मदत होते. आपली इच्छा, आकांक्षा पूर्ण होते. आपणाला आवश्यक ते यश लाभते. गायत्री उपासनेमुळे मनुष्य जीवनाच्या बाह्यांगाला व अंतरंगाला दोन्ही दृष्टीने समृद्ध करण्याचा, समुन्नत करण्याचा राजमार्ग आपणाला गवसतो. बाह्य जीवनाची प्रगती होते पण अंतरंगाच्या विकासाशिवाय त्याला पूर्णता येऊ शकत नाही. बाह्य जीवनात लाभलेले वैशिष्ट्य किंवा यश थोडा जरी शोक, संताप झाला, कधी रोग उसळला किंवा इतर काट सोसावे लागले किंवा कसली अडचण आली, वाईट दिवस आले तर कुठल्या कुठे नाहीसे होऊन जात असते. पण ज्यांच्या जवळ अंतरंगातले सामर्थ्य आहे, दृढ़ता आहे. आंतरिक समृद्धी आहे, क्षमता आहे, त्याला 'बाह्य जीवनात मोठ्यात मोठा अवरोध आला तरी तो सुस्थिर बनून राहतो. मोठमोठ्या वादळाच्या तडाख्यात सापडून देखील तो आपली नाव कौशल्याने पार घेऊन जाऊ शकतो.भौतिक समृद्धी व आत्मिक शांती यासाठी उपासना करणे ही खरी वैज्ञानिक प्रक्रिया आहे. तीच अचूक साधना आहे. उपासनेत सर्वात श्रेष्ठ व सर्वात मोठी एकच गायत्री साधना आहे, हे वेगळे सांगायला नकोच,शास्त्रकारांनी गायत्रीची सर्वश्रेष्ठ शक्ति स्थिती व उपयुक्तता यांना एका स्वराने स्वीकारलेले आहे. नास्ति गंगासमं तीर्थ न देवः केशवात्परः गायत्र्यास्तु परं जाप्यं न भूतो न भविष्यति। गंगेसारखे पुण्यतीर्थ दुसरे नाही. केशवाशिवाय दुसरे श्रेष्ठ दैवत नाही. गायत्रीहून दुसरा श्रेष्ठ जप कधी झाला नाही किंवा होणार नाही.


नोव्हेंबर 2008

अखंड ज्योती

 
 
 

Recent Posts

See All
आमचा युग - निर्माण सत् संकल्प

मी आस्तिकता आणि कर्तव्यनिष्ठता हे मानवी जीवनाचे धार्मिक कर्तव्य मानतो. शरीराला देवाचे मंदिर मानून मी आत्मसंयम आणि नियमिततेने माझ्या...

 
 
 

Comments


©2020 by DIYA (Youth wing of AWGP). 

bottom of page