ऋषिचिंतन
- Akhand Jyoti Magazine
- Jul 20, 2021
- 1 min read
आपले शरीर अन्न, पाणी व हवा यांच्या आधारावर जगत असते. आपली उन्नती व आपला उत्कर्ष, आपले श्रम, चातुर्य बुद्धी व साधन-संपत्ती यावर अवलंबून असतात. पण आपल्या अंतरात्म्याची भूक मात्र यापैकी कुठल्याही साधनांनी मिटत नाही. आपण धनसंपत्तीने संपन्न असू तर खूपशा सुखसोयी आपणांस मिळविता येतात. आपल्या देहाला आराम मिळतो, सुखविलासाचा लाभ होतो पण त्याच बरोबर आपली हाव वाढते, तृष्णा वाढते व अहंकार देखील वाढतो. खुशामत करणारे आपल्या तोंडावर आपली भरपूर स्तुती करतात. पण जोवर आपल्या आत्म्याची उन्नती होत नाही तोवर आपणास तृप्ती लाभत नाही, संतुष्टी मिळत नाही व शांतीचा अनुभव घेता येत नाही.
आपली समृद्धी दुसऱ्यांचे लांबून डोळे दिपविण्यासाठी उपयुक्त असेल पण कुणाची श्रद्धा व सद्भावना मिळवायची असेल तर त्यासाठी अंतःकरणात उत्कृष्ट गुणांचा आधार असावा लागतो. यालाच दुसऱ्या शब्दात सज्जनता म्हणतात. ही प्राप्त करायची असेल तर त्यासाठी पावित्र्य, महानता, औदार्य व संयम यांची वाढ करणे अत्यंत आवश्यक असते.
आपले शरीर हेच सर्वस्व आहे असे मानले तर त्याच्या सुखासाठी विलास, वैभव यांची रेलचेल असेल तर ते पुरेसे होते. पण जर आपल्या अंतरंगात कुठे तरी अंतरात्म्याचा निवास आहे व अंतःकरणाच्या संतुष्टीच्या दृष्टीने देखील आपल्याला काही करणे आवश्यक आहे अशी जाणीव होत असेल, तर त्याच्या तुष्टीसाठी आपल्या अंगी महानता व शालीनता यांची पूर्ती करणे व आपले चिंतन, आपले चारित्र्य यांची जोपासना करणे अत्यावश्यक ठरते. शरीराच्या पोषणासाठी जेवढे किमान आवश्यक असेल त्याची तेवढी भरपाई करून पुरेसा संतोष मानायला पाहिजे व आत्मपरिष्काराच्या कार्यासाठी आपल्या प्रतिभेचा योग्य तो उपयोग केला पाहिजे..
- पं. श्रीराम शर्मा आचार्य
डिसेंबर 2008
Comentarios